दिघंची परिसरातील वाळू विक्री व लिलाव होऊ नये यासाठी आंदोलनाचा इशारा

संग्रहित चित्र


आटपाडी/प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील दिघंची व लिंगीवरे परिसरातील माणगंगा नदी व ओढा पात्रातील वाळूचा लिलाव किंवा वाळू विक्री टेंडर होऊ नये,यासाठी परिसरातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आटपाडी तालुक्यातील दिघंची व लिंगीवरे गावातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने हे निवेदन देण्यात येत असून सध्या लिंगीवरे व दिघंची भागामध्ये शेतकऱ्यांना पाण्याची तीव्र टंचाई आहे.माण नदी व परिसरातील ओढा पात्रात टेंभू योजनेचे पाणी सोडावे, म्हणून पालकमंत्री जयंतराव पाटील यांना सर्व शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे.
 ओढा व नदीच्या पात्रात वाळू उपसा झाल्यास या ठिकाणी पाणी थांबणार नाही व पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.त्यामुळे येथील वाळू उपसा करण्याचे टेंडर होऊ नये किंवा वाळू विक्री परवाना देऊ नये,अन्यथा आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने येथील सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल असे म्हटले आहे.
निवेदनाच्या प्रती जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,पुणे येथील महसूल आयुक्त, सांगलीचे पोलीस अधीक्षक, आटपाडीचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात येत आहेत.