बामणोली विभागास आरोग्य सुविधा प्राधान्याने द्या-शिवेंद्रसिंहराजे भोसले
मेढा(धनंजय गोरे):-डोंगराळ दुर्गम अश्या बामणोली विभागात आरोग्याच्या सुविधा कोरोनाच्या काळात प्राधान्याने द्याव्यात यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सोबत बैठक घेवून बामणोली आरोग्य केंद्राला १०२ रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध करावी तसेच आपटी आरोग्य उपकेंद्र लवकरात लवकर सुरू करून या भागातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावावा,अशा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांना केल्या आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी सातारा यांच्या सोबत झालेल्या बैठकिस आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषद सदस्या सौ.अर्चनाताई रांजणे,माजी जि.प.सदस्य राजू भोसले,समाजसेवक ज्ञानदेव रांजणे,फिरोज पठाण,डॉ.ज्ञानेश्वर मोरे,जावली बाजार समिती सदस्य शिवाजी गोरे,राष्ट्रवादी आय टी सेल अध्यक्ष सागर धनावडे उपस्थित होते. या बैठकीत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले बामणोली आरोग्य केंद्राचा कोरोनाच्या काळात कारभार चांगल्या प्रकारे चालू असून त्यासाठी त्यांना १०२ रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली .त्यावर लगेचच डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांनी कायमस्वरूपी रुग्णवाहिका मिळेपर्यंत भाडेतत्वावर रुग्णवाहिका लवकरच उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले
सोबतच आपटी उपकेंद्राबाबत केलेल्या सूचना बाबत देखील सकारात्मक निर्णय घेत आपटी आरोग्य उपकेंद्र आठवड्यातून एक दिवस सुरू करण्याचे बैठकी मधे ठरले,त्याप्रमाणे मंगळवार पासून आठवड्यातून एक दिवस उपकेंद्र सुरू राहणार आहे,तसेच जावली तालुक्यातील सर्वच आरोग्य केंद्रामध्ये रिक्त असणारी पदे लवकरात लवकर भरण्याच्या केलेल्या सूचना लवकर आमलात आणल्या जातील असे डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले.
