छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण बहुजन बांधवांसाठी खुले केले : माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे



   
इंदापूर : प्रतिनिधी
  छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांसाठी शिक्षण खुले केले, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष, मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष
रत्नाकर मखरे यांनी आज (दि.२६ जून) येथे बोलताना केले.राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित
भिमाई आश्रमशाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
  शिफा मुल्ला ह्या लहान मुली समवेत मखरे व संचालिका शकुंतला मखरे यांच्या हस्ते छ.शाहू महाराजाच्या प्रतिमेचे पूजन करुन या कार्यक्रमास सुरुवात झाली.जयंती साजरी करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती.
  रत्नाकर मखरे पुढे म्हणाले की, छ.शाहू महाराजांना काळाच्या पुढे पाहण्याची दृष्टी लाभली होती.समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी अचूकपणे जाणले होते,म्हणूनच त्यांनी सर्वसामान्य माणसांपर्यंत शिक्षण पोहोचवण्या
करिता धोरणे आखून ती अंमलात आणली.बहुजनांसाठी शिक्षण खुले केले.समाजातील शोषित व मागास वर्गाला आरक्षण देण्याची कल्पना सर्वप्रथम शाहू महाराजांनी मांडली.शिक्षणानंतर बहुजन वर्गाच्या रोजगाराची सोय व्हावी.तो आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्याची संकल्पना त्यांनीच मांडली,म्हणूनच त्यांना आरक्षणाचे जनक म्हटले जाते,असे ते म्हणाले.
  समाजातील विषमता,भेदाभेद नष्ट करण्याच्या त्यांच्या प्रयत्नास तत्कालीन उच्चवर्णीयांनी केलेल्या कडव्या विरोधास छ.शाहू महाराजांनी जुमानले नाही.आपले कार्य त्यांनी पूर्णत्वास नेले.रयतेचा राजा अशी पदवी रयतेनेच बहाल करावी यातच छ.शाहू महाराजांची महानता आहे,असे मखरे यांनी साांगितले.
  या कार्यक्रमास भिमाई आश्रमशाळेतील शिक्षक,विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.