विटा-महाबळेश्वर रस्त्याच्या ठेकेदारामुळे शेतकऱ्यांना होतोय मनस्ताप



रस्त्यावर   नाले नसल्याने शेतात पाणी भरले

मेढा(धनंजय गोरे):-विटा-महाबळेश्वर रस्त्याच्या चार पदरीकरणाचे काम   सध्या वेगाने सुरू असून नाले न काढल्यामुळे रस्त्याचे पाणी लगतच्या शेतात जात असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याच्या ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी सज्ज असलेल्या शेतकऱ्यांना मनस्ताप देणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

विटा ते महाबळेश्वर या रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याचे काम जावळी तालुक्यात मेढा, केळघर, व केळघर घाट या परिसरात वेगाने सुरू आहे. हे काम करत असताना बहुतांशी ठिकाणी मोऱ्या तसेच रस्त्याची उंची वाढवल्याने व रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाले न काढल्याने  रस्त्यालगत असणाऱ्या भात खाचरामध्ये रस्त्याचे पाणी घुसत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने ही खाचरे पाण्याने तुंबलेल्या  अवस्थेत आहे. खाचरातील पाणी जाण्यास मार्ग नसल्याने काही ठिकाणी भात खाचरांच्या ताली पडलेल्या आहेत.
वास्तविक रस्त्याचे रुंदीकरण करताना दोन्ही बाजूने नाले उकरने गरजेचे होते. शेतकऱ्यांनी ही बाब संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिली असता त्यामुळे हे कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने शेतकऱ्यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान नाले न काढल्याने आंबेघर गवडी येथील शेतकऱयांचे नुकसान झाले असून ठेकेदाराने  तातडीने नाले काढून द्यावेत अशी मागणी आंबेघर येथील आनंदा शेलार यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
          मेढा-केळघर रस्त्यावर ज्या ठिकाणी नाले नाहीत त्या ठिकाणी तातडीने नाले काढण्याचे काम केले जाईल.शेतकऱयांचे नुकसान होऊ नये ही बांधकाम विभागाची भूमिका आहे.
           कृष्णात निकम ,उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मेढा.