विशेष लेख-
'निसर्ग' या संज्ञेतच सर्व पर्यावरणाचे स्वरूप सामावले आहे.पर्यावरणात निसर्गनिर्मित अनेक पर्यावरण परिसंस्थाचा समावेश हा होत असतो.यात उंच-उंच पर्वत शिखरे, डोंगर, नदया, नाले ,ओढे,सागरी भाग,जमिनीचा भूभाग,हवा, पाणी,माती, दगड, खडक,आकाश ,अनेक प्रकारची झाडेझुडपे ,पशुपक्षी आणि त्यांच्या सर्व परिसंस्था ह्यांचा समावेश यात होतो. सर्व 'जीवसृष्टी' ही पर्यावरणात येते. या साऱ्या निसर्गनिर्मित गोष्टी विस्मयकारक अशाच आहेत.निसर्गाचा हा कला कार्याविष्कार सर्वांना अचंबा करायला लावणारा आहे.निसर्गाचा हा महिमा फार मोठा आहे. हा निसर्ग आपल्याला पर्यावरणात्मक रूपात प्रकट होताना दिसतो. हा 'निसर्गराजा' तऱ्हेतऱ्हेच्या फुला-फळांनी ,नानाविधी गंधानी, रंगीबेरंगी पानाफुलांनी ,बहरताना, उमलताना दिसतो.ही 'वसुंधरा' विविध आकाराने, रंग रूप गंधाच्या साज शृंगाराने नटली आहे.नवतेजाचे नित्य नवे हे तेजरूप लेऊनी ही अवनी सजली आहे.तिच्या गिरीकिंदरातूनी उमटतात सप्तस्वरांचे सुमधुर ध्वनी. ती धबधब्यांच्याचा फेसाळत वाहत जाणाऱ्या पाण्यातून नृत्याविष्कार करते आहे.सागर तटावरी उचंबळणाऱ्या उंच-उंच सागर लाटालहरीतून ,ती 'जलक्रीडा' करते आहे.नाच हा तयाचा नित्य नियमाने सुरू असे. आपल्याला निसर्गाची ही विलोभनीय दृश्ये जागोजागी अनेक स्वरूपात पाहिला मिळतात.
हा विश्व आकाशाचा भव्यदिव्य मंडप कुणी थाटला आहे.रात्रीचे चांदण्यारूपातील चमचम करणारे सारे लक्ष-लक्ष दिवे आकाशी कुणी लावले आहेत. ते मन आपुले वेधुनी घेतात.वरती आपुल्या नजरा खेळऊनी ठेवतात.या सृष्टीत 'निसर्ग' या कलाकाराने प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार व संधी प्राप्त करून दिली आहे. अखिल विश्व मानवाचे अस्तित्व हे देखील या निसर्गरुपी पर्यावर्णाचाच एक अविभाज्य असा भाग आहे.आपण सर्वजण निसर्गाच्या आधीन आहे. निसर्ग हा आपल्या आधीन नाही. त्याने आपल्याला जगण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे. जसा मानवाला या सृष्टीत जीवन जगण्याचा अधिकार आहे तसाच तो अधिकार निसर्गाने इतर साऱ्या जीवजंतू , प्राणीमात्रांना देखील दिला आहे .याची जाणीव मानवाने ठेवणे गरजेचे आहे.पण मानव हा निसर्गाला आपल्या अंकित ठेवू पहात आहे. मानवाचा अनेक ठिकाणी अनेक प्रकारांनी आतायतीपणा होतआहे.अनेक पशुपक्षी यांच्यावर तो अन्याय, अत्याचार करीत आहे. मानव साऱ्या जगातील सर्व गोष्टींवरआपलाच मालकी हक्क प्रस्थापित करीत आहे.निसर्गाने जणू काही सर्व काही माझ्यासाठीच निर्माण केले आहे. अशाच अविर्भावात तो जीवन जगतो आहे. पर्यावरणातील इतर जीवांच्या जगण्याला तो डावलत आहे. निसर्गातील त्यांचे हक्काचे जगणे नाकारता आहे.
अनेक भौतिक सुविधा व प्रगतीच्या नावाखाली होणारी बेलानूम वृक्षतोड ही पर्यावरणास घातक ठरत आहे.आज अनेक बंधने कायदे असूनही राजरोसपणे वृक्षतोड ही चालूच आहे. झाडांची होणारी ही कत्तल काही केल्या थांबत नाही. पर्यावरणाचा होणारा हा ऱ्हास कुठेतरी आता रोखला जावा.यात आणखी कडक निर्बंध हे आणले जावेत. रस्ते, इमारती, अनेक सार्वजनिक कार्यालये व अन्य बऱ्याचशा कारणास्तव वृक्षतोड ही मोठया प्रमाणात होत आहे. परंतु त्या बदल्यातआज पर्यायी वृक्षारोपण व वृक्षसंगोपन होताना दिसत नाही. ही चिंतेची बाब आहे. जेवढी झाडे तोडली गेली तेवढीच झाडे लावली जातात का? ती वाढवली जातात का ?अन झाडे लावलीच तर ती प्रामाणिकपणे जगविली जाताता का?हा मोठा संशोधनाचा विषय बनला आहे. आज हायटेक अशा मोठाल्या रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. यात एकीकडे विकास सुरू असताना दुसरीकडे निसर्गाचा भकास होत चालला आहे. या रस्त्यासाठी अनेक ठिकाणची झाडे तोडली जात आहेत.त्यामुळे उजाडपणा निर्माण होतआहे.सिमेंटची जंगले निर्माण होत आहेत.अनेक प्रकारच्या छोट्या- मोठया सिटी उभारल्या जात आहेत.कारखाने वाढत आहेत. प्रदूषणाची धुराडी धूर ओकत आहेत. ती पर्यावरणास मारक ठरत आहेत. कारखानदार, रस्ते निर्मिती करणारे मोठे कंत्राटदार यांना सक्तीने पुन्हा नव्याने वृक्ष लागवड करण्यास लावले पाहिजे. इतकेच काय पण त्यांच्यावर अनेक वर्षे ही संगोपनाची सक्ती ही केली गेली पाहिजे.जेणेकरून विकासात्मक कामामुळे झालेल्या वृक्षतोडीची पुन्हा नव्याने भरपाई होईल.
वृक्षरोपणाचे नुसते सोहळे साजरे करण्यापेक्षा वास्तवातील वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन झाले पाहिजे.दिखाऊपणाचे बेगडी वृक्षारोपण नको आहे. असले वृक्षारोपण काय कामाचे ?निसर्गकर्मी हाच पर्यावरणाचा जन्मदाता आहे. यात जलचर, भूचर, उभयचर, सरपटणारे, हवेत उडणारे या सर्व पशुपक्षी यांच्यासह निसर्गनिर्मित परिसंस्था येतआहेत. निसर्गाने किडामुंगी पासून ते सृष्टीतील सर्व जीवांना जगण्यासाठीची काही ना काही कला व संरक्षण दिले आहे.यात मानवाकडून हेराफेरी केली जात आहे. त्यामुळे त्यांचे जीवन जगण्याचे स्वातंत्र्य हिरावले जात आहे. त्यांच्या जीवन जगण्यावर गदा येत आहे. परंतु वास्तविकता माणूस हा फार स्वार्थी वृत्तीने वागत आहे. कधी-कधी तो इतका अविचार करतो की इतर प्राणीमात्रांचे पशुपक्षांचे जगणेच तो मुश्किल करतो आहे. त्यांच्या जीवन जगण्यातला तो अडथळा बनत आहे.अकारण तो त्यांचा छळवाद करीत आहे. त्यांची घरटी, निवारे उध्वस्त करीत आहे. त्यामुळे अनेक प्राणी व पक्षी यांच्या अनेक जाती नष्ट होत चालल्या आहेत.त्यांचे अस्तित्वच हद्दपार होत आहे. या जगातून अनेक जातीचे प्राणी व पक्षी हे लुप्त होत आहेत.काही निर्दयी वृत्तीचे विनाशक मानव अनेक ठिकाणी जंगलाला कृत्रिमरित्या वणवा लावतानाच्या घटना आपण प्रसार माध्यमातून ऐकतो वाचतो आहे .त्याने हजारो झाडे जळून भस्मसात होत आहेत.त्यात अनेक पशुपक्षांची होरपळ होत आहे. अशी विघातक विकृत कृती करणाऱ्या निर्लज्ज माणसांच्याठायी कसलीही 'माणुसकी' ही राहिली नाही. या वणव्यातून किती वनसंपदा नष्ट होत आहे. कधीही भरून न निघणारे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे.हे माहीत असताना सुद्धा काळी कृत्ये करणारी ही निष्ठुर माणसे पर्यावरणाच्या मुळावरच उठतात.
आपणास माहीत आहे की, मागे एखादा आफ्रिकेच्या जंगलाला वणवा लागला होता. त्यावेळी लक्षावधी वृक्ष ,पशुपक्षी अग्नीच्या भक्षस्थानी पडून, त्यात होरपळले गेले. त्यात पर्यावरणाची फार मोठी अपरिणीत अशी पशुपक्षी व इतर प्रकारची हानी झाली.शेवटी वरुण राजाची मेहरबानी झाली आणि त्या पाऊसमुळे ती आग आटोक्यात आली.त्यामुळे जास्तीचे होणारे नुकसान टळले.काही फुकाची वेडी मंडळी निर्दयीपणे अनेक ठिकाणी उगाचच आग लावतात. अशांना शोधून काढून मोठयात मोठी शिक्षा ही दिली पाहिजे.रोज वृक्ष आपल्या जीवनासाठी हजारो किंमतीचा ऑक्सिजन पुरवितात.सदैव कृपेच्या सावलीचे छत्र आपणावरती धरतात.अशी देव स्वरूपातील झाडे उध्वस्त करणे म्हणजे त्याच्यासारखे अन्य कोणतेही दुसरे महान पातक असूच शकत नाही.झाडे लावणे आणि ती जीवापाड जगविणे हे देवाधर्मी थोर असे 'पुण्यकर्म 'आहे. असे असताना बेअक्कलीपणाने झाडावर कुऱ्हाड चालविणे हे योग्य नाही. कुऱ्हाड बंदी, राखीव जंगलक्षेत्र ,सामाजिक वनीकरण,जंगली प्राणी पक्षी यांच्या हत्या थांबविणे यांसारख्या महत्त्वकांक्षी योजनांना चांगली बळकटी दिली पाहिजे.त्या खालपर्यंत प्रामाणिकपणे राबविल्या गेल्या पाहिजेत.तेव्हाच खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे रक्षण हे होणार आहे.
अन्यथा मानवाला सतत निसर्गाच्या 'दशावतारी' प्रकोपला सामोरे जावे लागेल. याने निसर्गाच्या प्रलयकारी रुद्र अवतारात होत्याचे नव्हते होत आहे.यात अनेक वेळा मानवी जीवन उध्वस्त होत आहे.निसर्गरित्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नैसर्गिक संकटे येत आहेत. यात महा प्रलयकारी भूकंप, महापूर,दुष्काळ, तप्त उष्णतेच्या लाटा, रोगराई, वेगवेगळ्या प्रकारची वादळे ही येत आहेत. तेव्हा कोठे मानवाला जाग येत आहे. आपण आता तरी पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. झाडे लावली पाहिजेत ती जगवली पाहिजेत, पशुपक्षी यांचे जीवन अबाधित ठेवले पाहिजे. त्यांचे रक्षण केले पाहिजे. नाहीतर भविष्यात निसर्ग हा आपल्याला आता कदापिही माफ करणार नाही. तेव्हा या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त आपण सारे मिळून एक संकल्प करूया. पर्यावरणाचे रक्षण करू या!आपले जीवन सुरक्षित ठेऊ या!निरोगी जीवन आपुले जगू या!
✒️शब्दांकुर व लेखन ....✍️ -
श्री सतेशकुमार(एसकुमार)माळवे सर
एक वृक्षप्रेमी वृक्षमित्र.......
|| पर्यावरण बचाओ|| वसुंधरा बचाओ||
भ्रमणध्वनी-7758978761/9011668894

