इंदापूर : वार्ताहर
शहरातील कसबा भागात नऊ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. आणखी दोघा जणांचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता डआहे. हे टाळण्यासाठी व्यापारी व पदाधिकारी यांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येवून किमान दहा दिवसांसाठी जनता कर्फ्यूचा अंमल करणे व काही अनिष्ट गोष्टींना पायबंद घालणे गरजेचे झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, इंदापूर तालुका व शहरात लाॅकडाऊन सुरु झाला तरी कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या तुरळक होती. अगदी सुरुवातीला झालेला भिगवणच्या वृध्द महिलेचा मृत्यू वगळता चार रुग्ण बरे होवून घरी गेले होते. मागील महिनाभरापर्यंत शहरात कोरोनाचा रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे शहरवासी निश्चिंत होते. मात्र दर्गा मस्जिद चौकातील एका वृध्दाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कसबा पेठ व मंडई येथे दोन रुग्ण आढळून आले. त्यामुळे वातावरण ढवळले गेले. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या चाळीस जणांपैकी नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्ताने आज इंदापूरकरांच्या डोळ्यावरची झोप उडवली आहे.
कसबा पेठेत रुग्ण आढळल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने रविवारच्या दिवशी जनता कर्फ्यू लागू केला होता. मात्र आत्ता आणखी नऊ रुग्ण आढळले. इतर दोघा जणांचे स्वॅब चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. यामुळे अधिक खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे.
शहरात किमान दहा दिवस सर्व व्यवहार बंद ठेवण्याची गरज आहे. यासंदर्भात तहसीलदार सोनाली मेटकरी, उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी आधीची परिस्थिती व आत्ताची परिस्थिती वेगळी असल्याचे सांगितले. प्रशासकीय यंत्रणा आत्ता तुम्ही बंद ठेवा असे कोणाला ही सांगू शकत नाही. व्यापारी, पदाधिकारी व लोकांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येवून किमान काही दिवस शहर कडकडीत बंद ठेवणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
इतर ही महत्वाच्या बाबींसंदर्भात कार्यवाही होणे आवश्यक आहे. लाॅकडाऊन शिथिल होण्यापूर्वी महसूल, पोलीस यंत्रणा व नगरपरिषदेच्या कर्मचारी वर्गाने खबरदारी घेवून अत्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवून कोरोना नियंत्रणासाठी काम केले होते. मात्र लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व बाह्यवळण रस्ते खुले करण्यात आले. त्यामुळे लोक बिनधास्तपणे लांबपल्ल्यांचे प्रवास करु लागले आहेत. परवानापत्र, आरोग्य तपासणी पत्राशिवाय एका जिल्ह्याच्या हद्दीतून दुस-या जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करणे सोयीचे जावे यासाठी रात्री उशीरा किंवा पहाटे लवकर निघण्याचा उद्योग काही मंडळी करत आहेत.
लाॅकडाऊनपासून शहरातील आठवडा बाजार व मंडई निर्धारित ठिकाणी भरत नाही. टेंभुर्णीवेस नाक्याजवळच्या इंगोले मैदानावर दररोज पहाटेस आठवडा बाजाराचा खेळ चालतो आहे. सकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास बाजारकरी येतात. त्यावेळेपासून बाजारात गि-हाईकांची गर्दी होत असते. सकाळी दहा वाजेपर्यंत देवघेव होते. या वेळी भाज्यांवर पडणा-या उड्या, सामाजिक अंतराच्या नियमाचा पार चोळामोळा करुन टाकतात. तर अपवाद वगळता बहुतेक बाजारकरी व गि-हाईक उघड्या चेह-याने बाजारात वावरत असतात. नऊ रुग्ण आढळून देखील आजच्या दिवशी हीच परिस्थिती कायम होती. या दोन्ही बाबींना पायबंद घातला गेला नाही तर ‘हर घर कोरोना, हर अंगण कोरोना’ होण्यास वेळ लागणार नाही, अशी सामान्य लोकांची प्रतिक्रिया आहे.