इंदापूर : प्रतिनिधी - केंद्रसरकारने इथेनॉलचे दर कायम ठेवल्याने कमी होणा-या साखरेच्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर इथेनॉल निर्मिती हा उत्पन्नाचा कायमस्वरूपी व शाश्वत पर्याय आहे, असे मत वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटच्या इथेनॉल उत्पादनविषयक सेमिनारमध्ये तज्ज्ञांनी व्यक्त केले. कर्मयोगी साखर कारखाना व निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे संयुक्त सेमिनार कर्मयोगी सहकारीच्या कार्यक्षेत्रात पार पडले. राज्याचे माजी मंत्री कर्मयोगी सहकारीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष पद्मा भोसले, निरा-भिमा सहकारीचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांच्यासह दोन्ही कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक बी.जी.सुतार, निरा-भिमा कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक गेंगे, दोन्ही कारखान्याचे संबंधित विभागाचे अधिकारी या सेमिनारला उपस्थित होते. इथेनॉलच्या वापराने पर्यावरणाची हानी रोखली जाते. इथेनॉलच्या निर्मितीमुळे साखर कारखान्यास अधिकचा महसूल मिळतो. सभासदांना त्याचा फायदा होतो. सिरप टू इथेनॉल किंवा बी हेवी मोलासेस टू इथेनॉलमुळे बाजारातील साखर साठा कमी होणार आहे. अतिरिक्त साखर इथेनॉल निर्मितीसाठी वापरली जाणार आहे. पर्यायाने अतिरिक्त साखर कमी होऊन साखरेचे दर वाढणार आहेत. स्टिम, वीज यामध्ये बचत होऊन कारखान्याचा क्रशिंग रेट, आसवनीची क्षमता वाढणार आहे. साखरेच्या दर्जामध्ये सुधारणा होणार आहे. इथेनॉलचा वापर व दर चांगला असल्याने त्वरित पैसे मिळून विक्रीविना पडून राहणा-या पोत्यांवरील व्याजाचा बोजा कमी होणार आहे,अशी मते वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटचे प्रतिनिधी डॉ.एस.व्ही.पाटील, हेड अल्कोहोल टेक्नॉलॉजिस्ट राजेंद्र गोडगे, अल्कोहोल टेक्नॉलॉजिस्ट डॉ.शिदनाळे यांनी व्यक्त केली. ज्युस टू इथेनॉल सिरप टू इथेनॉल बी हेवी मोलासेस टू इथेनॉल या विषयावरील इथेनॉल उत्पादन वाढीबाबत हे सेमिनार महत्वाचे ठरले. व्हीएसआयच्या प्रतिनिधींनी ज्यूस टू इथेनॉल, बी हेवी मोलासेस टू इथेनॉल सिरप टू इथेनॉलविषयी सविस्तर व सखोल चर्चा घडवून आणली. परिसंवादात मान्यवरांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली.
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क
" ग्रामिण महाराष्ट्र न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
Copyright
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.