इंदापूर : प्रतिनिधी (दि. २८)
पिडीत अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करणे नाकारणा-या उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी इंदापूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी अर्जाद्वारे उपजिल्हा शासकीय रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे केली आहे.
सविस्तर वृत्त असे की,लग्न करण्याचे आमिष दाखवून तरंगवाडी (ता.इंदापूर) येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची तक्रार इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.दि.२२ जून रोजी यातील आरोपी व सोळा वर्षांच्या पिडीत मुलीस पोलीसांनी ताब्यात घेतले होते.
दि.२४ जून रोजी मुलीचे वडील व एका महिला पोलीस कर्मचा-या समवेत त्या मुलीची शारीरिक तपासणी करण्यासाठी तिला उपजिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते.त्या वेळी कर्तव्यावर असणा-या डॉ.शिरीष साळुंखे या वैद्यकीय अधिका-यांनी,सध्या कोराना आहे.आपण पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी करू शकत नाही.मुलगी तिच्या त्या मुलासोबत कोठे कोठे फिरून आली असेल.सध्या रूग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ नाहीत,असे सांगत आरोग्य तपासणी करण्यास असमर्थता दाखवली.
गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. गुन्ह्याच्या पुराव्याच्या दृष्टीने पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक आहे.या पूर्वी अश्या ब-याच प्रकरणात रुग्णालयातील पुरुष वैद्यकीय अधिका-यांनी तपासणी केलेली आहे,असे महिला पोलीस कर्मचा-याने डॉ.साळुंखे यांना सांगितले. त्यावर बाकीचे डॉक्टर शहाणे आहेत मी तेवढा शहाणा नाही असे वक्तव्य करुन डॉ.साळुंखे तेथून निघून जात असताना,त्यांना विनंती करणा-या महिला कर्मचा-यास अवमान वाटेल असे वक्तव्य डॉ.साळुंखे यांनी केले.पिडीत मुलीस तपासणीसाठी बारामतीच्या महिला रुग्णालयात रवाना करण्यात आले,अश्या आशयाचे पत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.व्ही.लोकरे यांनी वैद्यकीय अधीक्षकांना दिले आहे.
बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाचे कलम २७ अन्वये पिडीत अल्पवयीन मुलीची जबरी संभोगाबाबत वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक असताना डॉ.साळुंखे यांनी आपले कर्तव्य टाळुन अल्पवयीन पिडीत मुलीची हेळसांड केलेली आहे.त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी,असे या पत्रात सहाय्यक पोलीस निरीक्षक लोकरे यांनी म्हटले आहे.
या संदर्भात डॉ.शिरीष साळुंखे यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की,दि.१७ जून रोजी उपजिल्हा शासकीय रुग्णालयात एक गर्भवती महिला
एक दिवसासाठी प्रसूतीसाठी दाखल झाली होती.तिची तपासणी आपण केली होती. तिची स्थिती संदिग्ध असल्याने तिला पुण्यात उपचारासाठी पाठवण्यात आले होते.पुण्यात तपासणीमध्ये ती महिला कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले.त्यामुळे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे यांनी आपणास १४ दिवस रुग्णालयात प्रसूती व शस्त्रक्रिया करु नका असे तोंडी आदेश दिले होते,असे ते म्हणाले.
दि.२२ जून रोजी उपरोक्त प्रकरणातील अल्पवयीन पिडीतेची पोलीसांनी सुटका केली होती.तिला दुस-या दिवशी (दि.२३ जून) रोजी तपासणीसाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते,असे सांगून ते म्हणाले की,त्या दिवशी उपस्थित असणा-या वैद्यकीय अधिका-यांच्या सांगण्यावरुन तिला दुसर्या दिवशी घेऊन या असे सांगून परत पाठवण्या आले.
बुधवारी(दि.२४ जून) आपण कर्तव्यावर असताना तिला तपासणीसाठी आणण्यात आले. त्यावेळी पिडीता पुरुष वैद्यकीय अधिकारीकडून तपासणी करण्याबाबत गोंधळलेल्या मनस्थितीत होती.वैद्यकीय अधीक्षकांनी चौदा दिवस प्रसूती वा शस्त्रक्रिया न करण्याची सूचना आपणास दिली होती.अश्या प्रकरणी महिला वैद्यकीय अधिका-याच्या उपस्थितीत तपासणी करणे बंधनकारक आहे,असा दावा त्यांनी केला.
महिला स्त्री रोगतज्ज्ञ नसल्याने व आपल्यामुळे पिडीतेस आपल्यामुळे कसला अपाय होवू नये,यासाठी आपण तिची तपासणी केली नाही,असे सांगून ते म्हणाले की,या सर्व गोष्टींची कल्पना वैद्यकीय अधीक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे यांना होती.त्यांच्या सहमतीनेच पिडीतेस महिला बारामतीस पाठवण्यात आले होते.
दरम्यान,या प्रकरणी डॉ.साळुंखे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.त्यांचे म्हणणे आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल,अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंदनशिवे यांनी दिली.