कोरोनासोबत शिक्षण आणि आरोग्य यांचा ताळमेळ बसविणे महत्वाचे : खासदार सुप्रिया सुळे



इंदापूर : वार्ताहर
भविष्यात कोरोनासोबत जगत असताना शिक्षण व आरोग्य याचा ताळमेळ बसवणे महत्वाचे आहे. असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (दि. १८ जून) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर त्या पत्रकाराशी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, कोरोनाचा संसर्ग व लाॅकडाऊन सुरु झाल्यानंतर आजपर्यंत चोवीस तास सतर्क राहून प्रशासकीय यंत्रणेने पूर्ण जबाबदारीने प्रशंसनीय काम केले आहे.

इतर आवश्यक कामांकडे दुर्लक्ष केले नाही.शिधापत्रिकेवरील धान्य जनतेपर्यंत पोहचवण्याच्या प्रक्रियेत कसला ही अडथळा येऊ दिला नाही. मनरेगा अंतर्गत रोजगार उपलब्ध करुन दिला. त्यामुळे मजुरांना दिलासा मिळाला. शेतक-यांना खरीपासाठी आवश्यक खते, शेती उपयोगी औषधे कृषी विभागाने उपलब्ध करुन दिली आहेत.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालये,महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने ऑनलाईन शिक्षणाची सुविधा केली आहे. इंदापूर पंचायत समितीचे गटविकास व गटशिक्षण अधिका-यांनी ऑनलाईन प्रोग्राम सुरु केला आहे. तथापि ७५ टक्के विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. उर्वरित २५ टक्के विद्यार्थी त्यापासून वंचित राहत आहेत ही बाब गंभीर आहे, असे मत व्यक्त करत, लवकरच या वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी योग्य उपाययोजना केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कोरोना आढावा बैठकीस राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, गटविकास अधिकारी विजयकुमार परिट, वैद्यकीय अधिक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ,मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, महावितरणचे सहाय्यक अभियंता रघुनाथ गोफणे, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, स.पो.निरी. दिलीप पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल राऊत, नगरसेवक पोपट शिंदे, अनिकेत वाघ, संजय सोनवणे, शिवसेना शहरप्रमुख महादेव सोमवंशी, प्रा.अशोक मखरे, मागासवर्गीय सेल शहराध्यक्ष दादासाहेब सोनवणे व इतर मान्यवर उपस्थित होते.


कोरोनामुळे इतर संसर्गजन्य रोगाची गांभीर्य कळाले.कोरोना हा भयंकर संसर्गजन्य रोग आहे. त्याच्या आधी क्षयरोग, मलेरीया व डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू या संसर्गजन्य रोगांनी थैमान घातले होते. क्षयाने संपूर्ण देशात साडेचार लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इंदापूर सारख्या तालुक्यात गतवर्षी १८० रुग्ण या रोगाने दगावले आहेत. कोरोनापेक्षा क्षयरोग हा भयंकर आहे. त्या संदर्भात जनजागृती करावी लागेल. पुढील काळात एक ही रुग्ण क्षयाने दगावणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

मलेरीया व डेंग्यू निर्मुलनाबाबत काम करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे मुंबई येथे वरळी येथे बांधण्यात आलेल्या रुग्णालयाच्या धर्तीवर आपल्या मतदार संघात रुग्णालय उभे करण्यात येणार आहे. आगामी चार वर्षात पुणे जिल्हा क्षयरोग, मलेरीया व डेंग्यू मुक्त करण्याचा आपला व खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांचा निर्धार आहे, असे त्या म्हणाल्या. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुढाकार घेऊन इंदापूर तालुक्यात उपजिल्हा रूग्णालय अद्यावत करावे.