धामणीकरांचा टंचाईच्या काळात वनराईला टँकरने पाणीपुरवठा




धामणी: प्रतिनिधी-
कोरोनाच संकट डोक्यावर असतानाही,
ऐन ऊन्हाळ्यात वनराई जगविण्यासाठी
धामणी गावांनी टँकरने पाणी पुरवठा केला आहे. त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

   मौजे धामणी ता. माण जि. सातारा या गावच्या जाधववाडी हद्दीतील  ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात सिने अभिनेते मा.सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई प्रकल्पाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपूर्वी वेगवेगळ्या प्रकारच्या शेकडो झाडांची लागवड केलेली आहे. यात वड, पिंपळ, आंबा, जांभूळ, करंज ,चिंच,पळस व जंगलात वाढणाऱ्या काही अन्य काही जंगली झाडांचा ही समावेश आहे.तसेच धामणी नजीकच्या उजाडओसाड डोंगर माथा व उतारावर  पाणी फाउंडेशन आणि सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून ही हजारो वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे.सध्याच्या कोरोनाग्रस्त संकटमय परिस्थितीत आणि उन्हाळ्यातील या पाणी टंचाईच्या काळात वृक्ष संगोपन व संवर्धन करण्याचे खरे भले मोठे आव्हान आहे.अशी कठीण परिस्थिती असताना देखील, वृक्ष प्रेमापोटी व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून  मा.सतेशकुमार माळवे सर व मा. प्रकाश खाडे ही दोन वृक्षप्रेमी मंडळी  ह्या झाडांना जगविण्या ,वाचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत.आजच्या कोरोनाग्रस्त संकटजनक परिस्थितीत शासन व प्रशासन स्तरावरील सोशल डिस्टन्सिंगसह इतर सर्व योग्य नियमांचे तंतोतंत पालन करीत, वृक्ष संगोपनाचे कार्य करीत आहेत.सध्याला उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.असे असताना ही  झाडे जगविण्याच्या या एकाच इच्छा शक्तीच्या बळावर सतेशकुमार माळवे सर व प्रकाश खाडे हे दोन ध्येयवेडे वृक्ष मित्र मनात हिरवे स्वप्न घेऊन सध्याला झपाटल्यासारखे वृक्ष संगोपणाचे काम करीत आहेत. प्रसंगी या झाडांसाठी ते स्वतःची पदरमोडही करीत आहेत. आज रोजी या झाडांना खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.या दोन बहादूर गड्यांनी कठीण समयातही हिंमत हारू न देता. या झाडांचे हिरवे तेज कमी होऊ दिले नाही.एकवेळ वृक्ष लागवड करण्याचे काम हे सोपे असते ;पण लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचे काम हे फार अवघड असते. सध्याला नेमके हेच अवघड काम ते दोघेजण एका विचाराने करीतआहेत.हे दोन वृक्षप्रेमी समाजसेवकआपल्याला मिळालेल्या  वेळेचा सद्उपयोग हा वृक्षसंगोपन कार्यात घालवीत आहेत.त्यामुळे सध्याला धामणी गावात वृक्षसंगोपणाचे काम हे अगदी जोमात  सुरू आहे. "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी |पक्षी ही सुस्वरें आळविते.||"या संत वचनाला जागवत ते हिरव्या वनराईचे स्वप्न सत्यात उतरविण्याचा एक यशस्वी प्रयत्न करीत आहेत आणि त्यांचा या प्रयत्नाला आज काही अंशी का होईना सफलता मिळाली आहे.काही दिवसांपूर्वी या यशस्वी वृक्षारोपण मोहिमेची व वृक्ष संगोपन कार्याची एका खाजगी टी. व्ही.वाहिनीने सुद्धा दखल घेतली.ते या ठिकाणी आलेआणि या यशस्वी सह्याद्री देवराई प्रकल्पाची यशोगाथा शुटिंग केली. त्याचे प्रसारण ही त्यांच्या वाहिनीवरून प्रसारित केले.या देवराईतील अनेक वृक्षांची सध्याला चांगली वाढ झाली आहे.यातील काही झाडे ही सहा ते सात फूट उंचीपर्यंत वाढली आहेत.येणाऱ्या यावर्षीच्या जून महिन्यात धामणीच्या या ज्योतिर्लिंग सह्याद्री देवराईत आणखी नवीन ५००० वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्यासाठीचे खड्डे खोदाई व त्यात माती भरण्याचे काम सध्याला पूर्ण झाले आहे.ह्या वृक्ष लागवडीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींच्या पूर्व तयारी कामांनी सध्याला वेग घेतला आहे.भविष्यात हे माणदेशातील एक रमणीय असे पर्यटनाचे केंद्र बनावे अशी अनेकांची अपेक्षा आहे.त्याची भविष्यात अपेक्षा पूर्ती होईल असेच काम सध्या तरी सुरू दिसत आहे.ह्या निसर्ग संवर्धनाच्या चांगल्या कामात अनेकजण आपापल्या परीने मदत करीत आहेत. यासाठी या देवराईत नव्याने वृक्ष लागवड करण्याकरिता लागणारी धामणी जोतिबा परिसरातील माळरानाची पडीक जमीन ही दादा जाधव ,सुखदेव जाधव, रामदास जाधव व रविंद्र जाधव हे टप्प्या -टप्प्याने उपलब्ध करून देत आहेत.या कामी ते स्वतःही काही योगदान देत आहेत.पाणी फाउंडेशनचे समन्वयक मा.अजित पवार, सह्याद्री देवराई समन्वयक मा योगेश गायकवाड, मा. सतेशकुमार माळवे सर ,समाज सेवक मा.प्रकाश खाडे,धामणीचे माजी उपसरपंच बाबुराव खाडे ,मा.चंद्रकांत नाकाडे मा .रविंद्र जाधव ,मा. सुधाकर नाकाडे ,मा. निलेश खाडे ,तालुका व धामणी गाव सर्व पाणी फाउंडेशन टीम तसेच सामाजिक वनीकरण व कृषी विभागातील अधिकारी ,कर्मचारी सेवक वर्ग आणि जोतिबा देवस्थानचे पुजारी नरबट आदि मंडळी ही यासाठी वेळोवेळी मदतीचा हात देत आहेत.
या सह्याद्री देवराईतील झाडांची सध्याला  काळजी घेणाऱ्या या काळजीवाहू वृक्षपप्रेमींचे सर्वच स्तरातून फोन ,व्हॉटस अँप व आदि सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार कौतुक होत आहे.