माणदेशी रत्ने*
"माणदेशाची किर्ती सातसमुद्रापार पोहचविणारे व्यक्तीमत्व: चेतना सिन्हा"
एक गुजराथी तरुणी सातारा जिल्ह्यात येते, आणि माणदेशी बनुन जाते, जणू ती माणदेशाची अविभाज्य अंग बनते.
तिने लहानपणी दुष्काळ हा शब्द पुस्तकात वाचलेला होता,
या दुष्काळी जनतेच्या व्यथा समजून घेण्यासाठी आलेली ही तरुणी माणदेशी माणसाचे अश्रु पुसणारी भाभीजी बनलेली आहे.
म्हसवड या दुष्काळी गावाची आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करुन देणारी व्यक्ती म्हणजेच चेतना गाला(सिन्हा) होय.
चेतना सिन्हा यांचे बालपण मुंबई येथे गेले. त्यांचे शालेय शिक्षण मास्टर्स ट्युटोरियल हायस्कूलमध्ये झाले.
त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी आणि अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी मुंबई विद्यापीठातून संपादन केली.
जयप्रकाश नारायण यांनी छात्र युवा संघर्ष वाहीनी ही तरुणांची संघटना स्थापन केली होती.
जयप्रकाश नारायणांच्या विचाराने चेतना गाला या प्रभावित झाल्या.
जयप्रकाश नारायण यांच्या समाजवादी विचारांकडे त्यांचा ओढा होता.
आणीबाणीच्या काळात त्या अनेक आंदोलनांमध्ये सहभागी झाल्या. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत सुद्धा त्या सहभागी झाल्या होत्या.
त्यात त्यांना अटक होऊन तुरुंगवासही भोगावा लागला होता.
काही काळ शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीची प्रमुख म्हणून त्यांनी काम केले.
यादरम्यान त्या माण तालुक्यात आल्या. नितीन दोशी, विजय गुरव, चंद्रकांत राऊत, रविंद्र महामुनी,मनोहर डोंगरे ,महादेव सरतापे, असे अनेक कार्यकर्ते जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत काम करत होते. माण मधील मजुरांना रोजगार हमी योजनेतून रोजगार मिळावा यासाठी विजय गुरव यांनी आंदोलन केले. या आंदोलनात चेतना सिन्हा या सहभागी झाल्या होत्या.
१९८७ मध्ये म्हसवड येथे राहणारे चळवळीतील कार्यकर्ते विजय गुरव यांच्याशी त्यांचे लग्न झाले.
विजयसिंह गुरव त्यांचा एका पत्रकाराने चुकून विजय सिन्हा असा उल्लेख केला होता. हेच आडनाव त्यांना कायमचे चिकटले.
आणि विजय गुरव हे सिन्हा झाले.
तीच त्यांची ओळख निर्माण झाली.
चेतना गाला यापण सिन्हा झाल्या.
चेतना सिन्हा यांनी माणदेशी सामाजिक संस्था याकाळात सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या सदस्यांना ७३ वी घटना दुरुस्ती याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी शिबिरे घेतली. या शिबिरात मी अनेकदा वक्ता म्हणून गेलो होतो. याच काळात चेतना सिन्हा यांचे काम पाहण्याची संधी मला मिळाली. अतिशय मनापासून काम करणे व हातात घेतलेले कार्य प्रामाणिकपणे पुर्ण करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
सुरवातीचा काळ खुप संघर्ष करावा लागला, अतिशय अडचणी आल्या, मात्र या अडचणी वर त्यांनी खंबीरपणे मात केली. लोकांना एकत्रितपणे कामे करुन लोकांचा उत्कर्ष करण्यासाठी त्यांनी खुप कष्ट घेतले. अनेक अडचणी असूनही त्यांनी जिद्द कधीच सोडली नाही. संकटाचे संधीत रुपांतर करण्याचे अनोखे कौशल्य त्यांनी आत्मसात केले आहे.
याच दरम्यान १९९६ सालात त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या. पाच वर्षे म्हसवड शहराच्या विविध प्रकारच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र राजकीय पिंड नसल्याने त्यांनी राजकारण सोडून दिले. आणि सहकार क्षेत्रात काम केले. सामाजिक कामामुळे त्यांना अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटी तर्फे रिसोर्सफुल वुमन हा पुरस्कार दिला. यानंतर त्या तीन वर्षे अमेरिकेत जाऊन राहिल्या. तेथील संस्थांना दुष्काळी भागातील अर्थव्यवस्था बाबत कल्पना दिली. यातून च एच एस बी सी बँकेच्या माध्यमातून माण तालुक्यातील नदी व ओढ्यावर सिमेंट बंधारे बांधले आहेत.
माण तालुक्यात पडलेल्या भयंकर दुष्काळात माणदेशी फौंडेशनच्या वतीने २० हजार जनावरासाठी चारा छावणी सुरु केली होती.
कोरोना शी सामना करणाऱ्या माणदेशी जनतेला दिलासा देण्यासाठी १० हजार लोकांना जीवनावश्यक वस्तू व किट वाटप केले आहे.
●माणदेशी बँकेचे कार्य●
म्हसवडसारख्या दुष्काळी भागातील स्त्रियांना स्वतःच्या रोजच्या कमाईतून काही बचत करण्यासाठी महिला बॅंक असावी, असे वाटत होते.
रिझर्व्ह बॅंकेच्या सर्व नियमांचा चेतना सिन्हा यांनी अभ्यास केला.
आवश्यक भाग भांडवल जमवले.
पण सर्व संचालिका निरक्षर असल्यामुळे त्यांचा बॅंकेचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅंकेने फेटाळला.
या महिलांसाठी साक्षरता वर्ग सुरू करण्यात आले. या महिला अशिक्षित असल्या तरी त्यांना व्यवहार ज्ञान आहे. हिशोब करता येतात,
हे पटवून देण्यात पुढे यश आले. आणि १० ऑगस्ट १९९७ रोजी 'माणदेशी महिला सहकारी बॅंकेचा' शुभारंभ झाला. सिन्हा या बॅंकेच्या संस्थापक, अध्यक्ष आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांना रोज स्वतः बॅंकेत येणे शक्य नसल्यामुळे 'डेली बॅंकिंग', 'डोअरस्टेप बॅंकिंग' या संकल्पना राबवून घरोघरी जाऊन पैसे गोळा करण्यात येतात. बॅंकेतर्फे महिलांना त्यांच्या नियंत्रणात असलेल्या उपक्रमांसाठी कर्ज दिले जाते. उदा. दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी कर्ज दिले जाते. डेअरी सुरु करण्यासाठी दिले जात नाही. उन्हात बसून माल विकणाऱ्या महिलांसाठी 'छत्रीसाठी बिनव्याजी कर्ज' आणि शालेय विद्यार्थिनींकरता 'सायकलसाठी बिनव्याजी कर्ज' दिले जाते.
●माणदेशी फाउंडेशन' द्वारे 'माणदेशी उद्योगिनी'
या व्यवसाय प्रशिक्षण शाळेतून ५० हजार महिला प्रशिक्षित होऊन बाहेर पडल्या आहेत.या प्रशिक्षण शाळेच्या म्हसवड,वडूज,दहिवडी,सातारा,हुबळी येथे शाखा आहेत.येथे संगणक प्रशिक्षण, शेळीमेंढीपालन, कुक्कुटपालन, गांडूळ खत निर्मिती, रेशीम उद्योग तसेच फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर, पाककला, भरतकाम असे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात.
●पुरस्कार●
●गॉडफ्रे फिलिप्स शौर्य अमोदिनी पुरस्कार -
●पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळाला आहे.
●कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार मिळाला.
● ग्रामीण उद्योजकतेसाठी जानकीदेवी बजाज पुरस्कार
●राणी लक्ष्मीबाई पुरस्कारनानाजी देशमुख पुरस्कार
●लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई स्मृती पुरस्कार मिळाला आहे.
त्यांना येल फेलो आणि अशोका फेलो शीप मिळाली आहे.
दावोस, स्वित्झर्लंड येथे होणाऱ्या २३-२६ जानेवारी २०१८ दरम्यान होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या सात स्त्री अध्यक्षांपैकी एक म्हणून निवड झाली होती.
.......
