म्हसवडमध्ये बकरी ईद उत्साहात; ईदगाह मैदानावर शांततेत नमाज पठण

 

म्हसवडमध्ये बकरी ईद उत्साहात; ईदगाह मैदानावर शांततेत नमाज पठण

म्हसवड वृत्तसेवा :
माण तालुक्यातील म्हसवड येथे बकरी ईद (ईद-उल-अजहा) सण मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि सामाजिक सलोख्याच्या भावनेत साजरा करण्यात आला. शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी विशेष नमाज पठणाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी मानकरी युनूस उर्फ गब्बार भाई हिदायतुल्ला काझी यांनी बकरी ईदचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व उपस्थित मुस्लिम बांधवांना सांगितले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून त्याग, समर्पण, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश दिला. त्यानंतर विशेष नमाज पठण करण्यात आले. गब्बार काझी यांनी नमाजपठण केले.

नमाज पठणाचा कार्यक्रम अत्यंत शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रसंगी म्हसवड शहरासह पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. ईदगाह मैदान परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

सदर कार्यक्रमासाठी म्हसवड पोलीस स्टेशनचे एपीआय श्री. पोमन साहेब यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चोख पोलीस बंदोबस्त ठेवून उत्तम सहकार्य केले. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घेतली होती.

कार्यक्रमानंतर मुस्लिम समाजाच्या वतीने मानकरी गब्बार भाई हिदायतुल्ला काझी यांच्या हस्ते एपीआय श्री. पोमन साहेब यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. समाजाच्या वतीने पोलिस प्रशासनाच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी मुस्लिम समाज बांधवांनी एकमेकांना बकरी ईदच्या शुभेच्छा देत आनंद साजरा केला. तसेच म्हसवड शहरातील विविध राजकीय, सामाजिक, व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांसह सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.

बकरी ईद निमित्त म्हसवड शहरात बंधुभाव, शांतता आणि सामाजिक सलोखा यांचे सुंदर दर्शन घडले.

...