महात्मा फुले जयंती दिनी सत्यशोधक ढोक सामजिक साहित्यिक पुरस्काराने झाले सन्मानित


 मुंढव्यातील महात्मा फुले यांनी सुरु केलेली शाळा आज अस्तित्वात नसली तरी त्या  शाळेचे पुनर्जीवन होणे गरजेचे  - माजी न्यायाधिश मान्धाता झोडगे 


पुणे (मुंढवा)- सम्राट रॉयल पब्लिक ट्रस्ट तर्फे थोरसमाज सुधारक महात्मा फुले यांची १९९ वी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी  संयुक्त जयंती महोस्तव २०२६  मुंढवा येथील गायकवाड वस्ती वर ११ ते १४ एप्रिल विवध कार्यक्रमाने आयोजित केलेला आहे. महात्मा फुले जयंती दिनी ११ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता ट्रस्ट चे वतीने महात्मा फुले चरित्र साधने व प्रकाशन समितीचे सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक यांना ज्ञानज्योती  सावित्रीबाई फुले पुस्तक ४ भाषेत लेखक म्हणून  प्रकाशित केले तसेच इतरही अनेक पुस्तके संपादक ,प्रकाशक वितरक म्हणून मोठे कार्य केले त्यामुळे सामाजिक साहित्यिक पुरस्कार २०२६ जेष्ठ समाजसेवक  लक्ष्मण महादू गायकवाड यांचे शुभहस्ते मोमेंटो शाल श्रीफळ आणि संविधान प्रत देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून माजी न्यायाधीश मान्धाता झोडगे व नगरसेवक स्थायी समिती सदस्य डॉ.कुमार उर्फ दादा कोद्रे उपस्थितीत होते.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माजी न्यायाधीश झोडगे साहेब यांनी आपले भाषणात म्हणाले की या मुंढवा परिसराला खूप महत्व असून छत्रपती शिवाजी महाराज यांना त्या काळात रसद पुरविण्याचे देखील काम केले जात होते . फुले दाम्पत्यांनी देखील या भागात येऊन अनेक प्रकारचे कामे केली असून या परिसरात म्हणजे गायकवाड वस्ती वर सावित्रीबाई फुले शाळेत शिकविण्यासाठी येत असत .त्यांच्या शैक्षणिक कार्याची आठवण व्हावी म्हणून  भिडे वाड्याचे पहिली मुलींची शाळा म्हणून राष्ट्रीय स्मारक सध्या तयार होत  आहे तसे  येथील शाळा जरी जमीनदोस्त झाली असली तरी एक ऐतिहासिक ठेवा म्हणून या वस्तीने पुढाकार घेऊन शाळेचे पुनर्जीवन करावे असे वाटते त्यासाठी वेळप्रसंगी आदोलन उभे करावे असे म्हणत माझा जन्म या मुंढव्यातील असून हा परिसर पूर्वीचा निसर्गरम्य , शेतीपुरक भाग होता आम्ही नदीतील बोटीमधून पलीकडील भागात जात होतो अशा जुन्या आठवणीना देखील त्यांनी उजाळा दिला.

याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ढोक म्हणाले की फुले दाम्पत्यांचे साहित्य प्रकाशित केले म्हणून व सत्यशोधक विवाह चळवळ महाराष्ट्र व इतर राज्यात नेली म्हणून आपण जो सत्कार केला त्याबद्ल तर आनंद होतो आहेच परंतु विशेष आनंद होतोय याचे कारण म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी बहुजन आणि अस्पृश्य समाजातील मुलीना आणि मुलांना शिक्षण देण्यासाठी १८४८ ते १८५२ या दरम्यान ज्या १८ शाळा चालू केल्या त्यापैकी दि.१ डिसेंबर १८५० रोजी या गायकवाड वस्तीवर ,मुंढवा भागात  चालू केलीली ती १४ वी शाळा होती आणि विशेष म्हणजे त्या शाळेत सावित्रीमाई शिकवत होत्या . ती शाळा कोठे होती हे मी काही जेष्ठांना विचारले असता समजले की ती शाळा कधीच जमीनदोस्त झाली आहे. मला या निमितात्ने विनंती करावयाची आहे की त्या ठिकाणी महात्मा फुले यांनी सुरु केलेली शाळेचा बोर्ड लावून परिसरातच  त्या नावाने शाळा पुनर्जीवित करावी. सावित्रीमाईना याच वस्तीवर १८९७ मध्ये प्लेगच्या साथीत काम करताना लागण होईल याची जाणीव होऊन देखील त्यांनी गायकवाड  मुलास दवाखान्यात पायी घेऊन गेल्या हे आपण विसरता कामा नये त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन या परिसरात फुले दाम्पत्य यांनी केलेले कार्य पुढील पिढीला प्रेरणादायी ठरावे म्हणून काम करणे काळाची गरजेचे आहे असे म्हणून या पावन भूमीत आपण माझा सत्कार केला त्यामुळे मला एक वेगळीच उर्जा मिळत रहाणार असे देखील म्हंटले. 

याप्रसंगी नगरसेवक डॉ,कोद्रे म्हणाले की मी नक्कीच या फुले दाम्पत्यांची कार्याची उतराई होण्यासाठी एखादे भव्य स्मारक उभे करण्यासाठी स्थायी समितीच्या माध्यमातून प्रयत्न करणार असे जनतेला आश्वासन दिले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदित्य गायकवाड  सूत्रसंचालन सुरज गायकवाड तर मोलाचे सहकार्य विजेंद्र गायकवाड ,अजित गायकवाड ,प्रकाश ढाले आणि अविनाश नागे तसेच  आभारप्रदर्शन गौरव गायकवाड यांनी केले. याप्रसंगी सम्राट ट्रस्ट ला ढोक यांनी फुले दाम्पत्य फोटो प्रेम  व सावित्रीबाई फुले ग्रंथ भेट देऊन सत्याचा अखंड गाऊन समारोप केला.