*कर्मवीर इंग्रजी ग्रामर सिरिजमधून इंग्रजी व्याकरणाचे धडे*
बार्शी (प्रतिनिधी) :
इंग्रजी व्याकरण म्हटले की विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ताण दिसतो. मात्र श्री शिवाजी महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक प्रा. डॉ. राहुल पालके यांनी आपल्या सहज, सोप्या, विनोदी आणि रंजक अध्यापन शैलीमुळे हा गंभीर विषय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सोपा आणि मनोरंजक करून दाखवला आहे.
गेल्या ११ वर्षांपासून श्री शिवाजी महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे डॉ. पालके यांनी वर्गात विविध उदाहरणे आणि विनोदांचा वापर करून विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढवली. विशेष म्हणजे त्यांनी ८ विषयांत तब्बल २० वेळा नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.
इंग्रजीतील फास्ट(fast), हार्ड(hard), लेट(late) यांसारख्या शब्दांमुळे विद्यार्थ्यांना होणारा गोंधळ त्यांनी विनोदी उदाहरणांतून स्पष्ट केला. He runs fast म्हणजे तो वेगाने धावतो; पण fast food खाल्ले तर पुन्हा धावायलाच लागते, असा हलकाफुलका विनोद करून त्यांनी शब्दांच्या वापरातील फरक विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. विशेषण (Adjective)आणि क्रियाविशेषण(Adverb) या घटकांवर बोलताना –ly प्रत्ययामुळे होणारा गोंधळ त्यांनी खास शैलीत उलगडला. Quick पासून quickly होते; पण friendly पासून friendlily’ होत नाही, असे सांगत त्यांनी वर्गात हास्याची लकेर निर्माण केली. त्याचबरोबर cowardly, deadly, lively, lonely या शब्दांत –ly असूनही ते विशेषण कसे आहेत, हे त्यांनी रंजक उदाहरणांतून पटवून दिले.
तसेच टेन्स(Tense) शिकविताना “ टेन्स(Tense) शिकताना विद्यार्थीच टेन्स tense होतात, असा विनोद करत त्यांनी वातावरण हलकेफुलके केले. साधा काळ (Simple tense) समजावताना Simple tense सांगताना स्थिती मात्र गुंतागुतीची(complex) होते, असे म्हणत त्यांनी व्याकरणातील गुंतागुंत सहजतेने स्पष्ट केली. त्यांनी लिव्ह व वर्क या शब्दांचा उपयोग विविध काळानुसार कसा होतो हे सोदाहरण स्पष्ट केले.डॉ. पालके यांच्या या अध्यापनाबाबत प्राचार्य डॉ. ए. बी. शेख व इंग्रजी विभागप्रमुख डॉ. समाधान पवार यांनी समाधान व्यक्त केले.
डॉ. पालके यांच्या या रंजक अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषा शिकण्याची आवड निर्माण होत आहे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. त्यांच्या विनोदी शैलीमुळे गंभीर वाटणारा व्याकरणाचा तासही विद्यार्थ्यांसाठी आनंददायी अनुभव ठरत आहे.
