...
शेतकऱ्याची लेक झाली 'फौजदार'; टाकेवाडीची कन्या रेश्मा दडसचा महाराष्ट्रात डंका!
बिदाल प्रतिनिधी: (आकाश दडस)
शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द असेल तर आभाळही ठेंगणे वाटते’, हे माण तालुक्यातील टाकेवाडी येथील रेश्मा जोतिराम दडस हिने सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI - २०२४) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, रेश्मा हिने महिला प्रवर्गातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून आपल्या गावाचे आणि तालुक्याचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे.
यशाचा प्रेरणादायी प्रवास रेश्माचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, वडूज येथे झाले, तर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण सातारा येथील नामांकित यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (YCIS) येथे पूर्ण झाले. तिने बी.एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स) ही पदवी मिळवल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. विशेष म्हणजे, पहिल्याच प्रयत्नात तिने महसूल सहायक पदाला गवसणी घातली होती. मात्र, तिचे स्वप्न खाकी वर्दीचे होते. दुसऱ्या प्रयत्नात तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर थेट पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालत राज्यात अव्वल स्थान पटकावले.
कर्तृत्ववान कुटुंबाची परंपरा
रेश्मा ही एका अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. तिचे आई-वडील शेतात घाम गाळून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी झटले. त्यांच्या कष्टाचे चीज करत रेश्माने हे यश मिळवले आहे. कौतुकास्पद बाब म्हणजे, रेश्माचा भाऊ नानासाहेब दडस यांनीदेखील यापूर्वी उद्योग निरीक्षक परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता, तर तिचा मावस भाऊ बापूराव दडस यांनी पोलीस उपअधीक्षक (DYSP) पदापर्यंत मजल मारली आहे. मावस बहिण ताई बिरा दडस मुख्याधिकारी(CO) पदी २०२३ निवड झाली आहे.एकाच कुटुंबातील भावंडांनी मिळवलेले हे यश संपूर्ण जिल्ह्यासाठी कौतुकाचा विषय ठरत आहे.
...
