संघर्षातून परिवर्तनाचा ध्यास साकार होतो : डॉ. राहुल पालके

 


रामनवमी निमित्त राम ... राम ...या कवितेचे भावपूर्ण सादरीकरण

बार्शी: प्रतिनिधी

समाजपरिवर्तनासाठी संघर्ष आवश्यक असून त्यामागे दृढ ध्येय आणि मूल्यांची जाणीव असावी, असे प्रतिपादन डॉ. राहुल पालके यांनी केले. रामनवमी निमित्त राम .. राम ...या कवितेचे भावपूर्ण सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आध्यात्मिक मूल्यांचा जीवनात सकारात्मक पद्धतीने विचार करणे गरजेचे आहे. मातीत श्रमाचा घाम गाळावा, जगण्यात राम असावा हा विचार त्यांनी व्यक्त केला.मानवतेचा मूलमंत्र जपत समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांशी स्नेहभावाने वागण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. पालके म्हणाले की, समाजात प्रत्येक व्यक्ती कोणाचातरी नातेवाईक असतो.कोणाचा बाप, आई, भाऊ किंवा बहीण अडचणींत असतात.त्यामुळे संकटात सापडलेल्या व्यक्तींना मदतीचा हात देणे हीच खरी माणुसकी आहे. समाजातील नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी माणुसकीच्या नात्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच जाती-धर्माच्या भिंती बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मनातील भेदभाव दूर करून व्यापक दृष्टीकोन स्वीकारल्यास समाज अधिक सक्षम होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले. “जिथे जिथे माणुसकी आहे, तिथे तिथे जगण्यातला राम आहे,” या विचारातून त्यांनी मानवतेचे महत्त्व स्पष्ट केले.

डॉ. पालके यांच्या या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली समाजात समता, बंधुता आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश त्यांनी दिला.