बार्शी : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या वतीने ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडिया आणि विवा कॉलेज, विरार यांच्या सहकार्याने आयोजित सोलर एनर्जी अवेअरनेस २०२५ प्रशिक्षण अभियानात श्री शिवाजी महाविद्यालय बार्शीने उल्लेखनीय यश संपादन करत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सोलर एनर्जी जनजागृती दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना सौर ऊर्जेचे महत्त्व, पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा बचतीसंदर्भात जनजागृती करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन व यशस्वी अंमलबजावणी समन्वयक म्हणून डॉ. राहुल पालके यांनी केली. याप्रसंगी डॉ. शेख म्हणाले, करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर दिला जातो.डॉ. पालके मनोगतात म्हणाले,कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांतर्गत विद्यार्थ्यांना तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करून विविध स्पर्धांबरोबर चालू घडामोडी व सामान्य अध्ययन यासंबंधी मार्गदर्शन केले जाते.
महाविद्यालयाच्या या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे अध्यक्ष डॉ. बी. वाय.यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी. टी. पाटील, सहसचिव ए.पी. देबडवार, खजिनदार व सांस्कृतिक विभाग प्रमुख बापूसाहेब शितोळे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी शेख आयक्यूएसी प्रमुख डॉ. समाधान पवार, डॉ. राहुल पालके, कृष्णा राहुल काठवटे यांचे अभिनंदन केले.भविष्यात अशा उपक्रमांतून समाजजागृतीस हातभार लागेल अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त करण्यात आली.
