*श्री शिवाजी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन संपन्न*
सध्याचे युग हे स्पर्धेचे असून स्पर्धा परीक्षेत ज्ञानाबरोबरच धैर्य, संयम, चिकाटी, नेतृत्वक्षमता हे गुण व्यक्तिमत्व विकासासाठी व परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करताना चौफेर ज्ञान घेणे आवश्यक आहे, असे मत मा. नितीन खेंदाड,सांख्यिकी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांनी व्यक्त केले.येथील श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी अंतर्गत कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत घेण्यात आलेल्या मार्गदर्शनपर व्याख्यानासाठी ते उपस्थित होते. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. ए. बी. शेख यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी स्पर्धा परीक्षा समन्वयक प्रा. डॉ. राहुल पालके उपस्थित होते.
पुढे बोलताना खेंदाड म्हणाले, मला महाविद्यालय काळापासून स्पर्धा परीक्षांचे वेध लागले होते. प्राध्यापक व अधिकाऱ्यांचे अनुभव करियर घडण्यात महत्त्वाचे ठरले. त्यातून अधिकारी व्हावेसे वाटले. योग्य पुस्तकांची निवड, सराव परीक्षा, आयोगाच्या पूर्व प्रश्नपत्रिकांची तयारी, तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलो.आयुष्यात अपयशाचे क्षण येत असतात, परंतु त्या क्षणांना सामोरे जाऊन यशाचे शिखर गाठावे लागते.स्पर्धा परीक्षा हे संयमाचे क्षेत्र असून वारंवार स्वतःला ज्ञानाच्या बाबत अद्यावत करणे गरजेचे आहे.त्यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिगत प्रश्न विचारून स्पर्धा परीक्षेतील अभ्यासक्रमाचे कसे नियोजन करावे याबाबत योग्य मार्गदर्शन केले.याप्रसंगी डॉ. पालके म्हणाले, कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन होत असते. त्यातून विद्यार्थ्यांना विविध विषयांची तयारी कशी करावी यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन केले जाते.विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य व नेतृत्व क्षमता विकसित करणे गरजेचे आहे. इंग्रजी उताऱ्यांचे आकलन होण्यासाठी शब्दसंग्रह वाढवण्याबरोबर श्रवण,वाचन, संवाद व लेखन कौशल्य विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.या मार्गदर्शनपर कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन व आत्मविश्वास मिळाला.
