प्रतिनिधी: बार्शी
शब्दांचे विश्व अनंत आहे. शब्दांची गुंफण करून साहित्य बहरते. शब्दांच्या दुनियेशी मैत्री करून कर्तव्याशी बांधील असणारे अधिकारी दुर्मिळ असतात. अधिकारी म्हणले की कठोर निर्णय घेणारी व्यक्ती अशी भावना प्रथम येते, परंतु या कठोर वाटणाऱ्या व्यक्तीत कोमल व हळूवार मन दडलेले असते. याचा प्रत्यय कवी श्री.विजय पाटील,सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांना प्रत्यक्ष भेटून आला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवी विजय पाटील यांची लेखनसंपदा जाणायला मिळाली. याप्रसंगी कवी व लेखक डॉ. राहुल पालके, ग्रंथपाल माधव टिपरसे,डॉ. विजयकुमार भांजे, डॉ. शिवाजी वाघमारे, प्रा. किरण खर्डेकर हे उपस्थित होते.
कवी पाटील पुढे म्हणाले, मला विविध विषयावरील पुस्तके वाचनाची आणि त्यावर आवर्जून पुस्तक विश्लेषण लिहिण्याची आवड आहे. आम्ही साहित्यिक, वाचनवेडा यासारख्या साहित्यरसिक ग्रुपवर इतरांबरोबर साहित्य आस्वाद घेण्याची आवड आहे. मला लहानपणापासूनच कविता, छोटे लेख विशेषतः व्यक्ती वर्णने लिहिण्याचा छंद आहे. याप्रसंगी डॉ. पालके यांनी पाटील सरांच्या साहित्यिक विश्वाची ओळख करून त्यांच्या साहित्यिक प्रतिभेचा आविष्कार मांडला. कवी पाटील यांचा विविध राज्यस्तरीय स्पर्धांत सहभाग असून त्यांच्या काव्यनिर्मितीला पारितोषिके प्राप्त झालेली आहेत. त्यांचे काव्यभ्रमंती, काव्यांजली, जन्मदाते हे काव्यसंग्रह (सहकवी) व गुंफण हा कथासंग्रह (सहलेखक) त्यांचा साहित्य विस्तार मांडतो. याप्रसंगी डॉ. पालके यांनी अंगणातून नभांगणात हा काव्यसंग्रहातील कवितांचे भावविश्व उलगडून दाखवले. तसेच कर्मवीर डॉ. मामांच्या साहित्याचा परिचय करून दिला. डॉ. भांजे यांनी साहित्यिक भेटीची उत्सुकता त्यांच्या आभारातून व्यक्त केली. मराठी भाषा समृद्धीची ही अनोखी भेट साहित्यिक विश्वात कुतुहुल निर्माण करणारी ठरली, अशी उपस्थितांनी भावना व्यक्त केली.
