मराठी भाषा गौरव दिन विशेष
बार्शी: प्रतिनिधी
साहित्य हा मानवी जीवनाचा आरसा आहे. साहित्यिक परंपरा मानवी जीवनाचे दर्शन घडविते. साहित्यिक कल्पनाशक्ती, निरीक्षण व अभ्यासातून कलाकृतींची निर्मिती करीत असतो. साहित्यातून मानवी जीवनाचे तरंग-अंतरंग उमटतात, असे मत मराठी साहित्य परिषद शाखा बार्शीचे अध्यक्ष पां. नि. निपाणीकर यांनी व्यक्त केले. मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते. याप्रसंगी कवी डॉ. राहुल पालके व साहित्याची आवड जोपासणारे विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे बोलताना निपाणीकर म्हणाले,समाजातून
चांगल्या गोष्टी टिपाव्यात व त्या फुलवाव्यात. त्यातूनच लेखक, कवी जन्माला येतात.वाचन, मनन, चिंतन हा उत्तम संस्कार आहे. त्यातून उत्कृष्ट साहित्यनिर्मिती होते. मराठी साहित्याची समृद्ध परंपरा जोपासावी.याप्रसंगी त्यांनी
मसाप शाखा बार्शीच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची माहिती विशद केली. त्याचबरोबर
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मसापच्यावतीने घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी डॉ. पालके म्हणाले, साहित्यिकांमध्ये साहित्याची जाण व कल्पकता येण्यासाठी मसापचे कार्य उत्कृष्ट आहे. विचारांचे सौंदर्य व कर्तृत्वाचे औदार्य साहित्यातून प्रकटत असते.उत्तम साहित्य निर्मितीसाठी साहित्यिकांशी संवाद साधला पाहिजे. त्यासाठी संघर्ष व धडपड करणे आवश्यक आहे. जिज्ञासा व शिकण्याची वृत्ती जोपासली पाहिजे त्यातून साहित्याची निर्मिती होते. मराठी साहित्याचे वाचन संस्कृतीची ओळख करून देते. याप्रसंगी वैष्णवी धस यांनी स्वलिखित कवितांचे सादरीकरण केले. कार्तिका निंबाळकर यांनी अंगणातून नभांगणात या काव्यसंग्रहातील निवडक कवितांचे सादरीकरण केले.
