ताज्या बातम्या:
बार्शी: प्रतिनिधी
इतिहासाच्या सुवर्णपानांवर कोरलेले शिवचरित्र काव्यातून उजळविणारी डॉ. राहुल पालके यांच्या शिवचिंतन व शिवगुंजन या कविता शिवपरिक्रमाचा विचार मांडतात. या कवितेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे तेज, स्वराज्याच्या संकल्पनेची दिव्यता आणि मानवमुक्तीचा ध्यास यांचा प्रभावी शब्दाविष्कार अनुभवायला मिळतो.शिवचिंतन कवितेच्या सुरवातीच्या “शिवचिंतनाने माणसे घडली, शिवचिंतनाने माणसे जोडली” या ओळी समाजघटक शक्तीचे प्रतीक ठरतात. शिवविचार हे केवळ ऐतिहासिक स्मरण नसून ते संस्कार, संघटन आणि नैतिकतेचे जीवनमूल्य असल्याचा संदेश कवी पालके सूचकपणे मांडतात. कवीने शिवरायांना निश्चयाचा महामेरू संबोधून त्यांच्या अढळ निश्चयाचे आणि नेतृत्वदृष्टिकोनाचे अप्रतिम चित्रण केले आहे. या स्वराज्यस्वप्नामागील मातृसंस्कारांची शिदोरी अधोरेखित करताना राजमाता जिजामाता यांच्या संस्कारांचे महत्त्व विशेषत्वाने रेखाटले आहे. कवीच्या शब्दांत सह्याद्री जणू लढवय्या छाती घेऊन उभा राहतो आणि स्वराज्याची पताका उंचावतो.“रयतेचे राज्य हाच शिवबांचा अखंड ध्यास ही ओळ लोकाभिमुख राज्यव्यवस्थेचा गाभा स्पष्ट करते. स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या मावळ्यांच्या त्यागाचे स्मरण करून “अखेरच्या श्वासापर्यंत लढला” या ओळींमधून बलिदानाची अमर गाथा साकार होते.आजच्या बदलत्या सामाजिक-राजकीय संदर्भात शिवविचारांची नव्याने मांडणी करणारी ही कविता तरुण पिढीला धैर्य, निश्चय आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारी ठरते.
‘शिवगुंजन’ ही कविता शिवचिंतनाच्या सामूहिक आणि स्पंदनशील शक्तीचे काव्यमय चित्र उभे करते. या कवितेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा, स्वराज्याच्या संकल्पनेचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा उत्कट आविष्कार आढळतो. कविता केवळ ऐतिहासिक गौरवगीत नसून ती प्रेरणादायी, चेतनादायी आणि सामूहिक ऊर्जेची अभिव्यक्ती आहे. "एक नाद, एक निनाद, एक साद"या पुनरुक्तीमधून कवीने ‘शिवगुंजन’ हा सामूहिक घोष असल्याची जाणीव करून दिली आहे."एक ध्यास, एक श्वास, एक विश्वास" या ओळींतून शिवविचारांचा सर्वांगीण प्रभाव दिसून येतो. बेधुंद, बेभान, बेफाम हा इतिहास या शब्दांतून इतिहासाची उर्मी आणि आवेश जाणवतो.‘शिवगुंजन’ ही कविता शिवाजी महाराजांच्या विचारांचा सामूहिक निनाद आहे. या कवितेतून स्वराज्याची प्रेरणा, राष्ट्रप्रेम आणि आत्मभान यांचे प्रभावी दर्शन घडते.ही कविता शिवचरित्राच्या स्मरणातून वर्तमानाला जागृत करणारी आणि मराठी मनात स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित करणारी ठरते. या शिवकाव्यातून डॉ. पालके यांनी शिवकार्याची ओळख करून दिली आहे.
