मायणी ग्रामपंचायतीने वीज कंपनीला दिला झटका,
पाणी पुरवठाही केला सुरळीत
मायणी:- प्रतिनिधी
मायणी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना थकीत लाईट बिलापोटी खंडित झाल्याने येथील पिण्याच्या पाण्याचा व स्ट्रीट लाईट बिलाचा प्रश्न ऐरणीवर आला असता. मायणी ग्रामपंचायतीने स्ट्रीट लाईट प्रश्नी वीज कंपनीला झटका देत ग्रामपंचायतीच्या करापोटी चक्क विद्युत मंडळाच्या कार्यालयालाच टाळे ठोकून झटका दिला .त्याच बरोबर येरळवाडी तलावातून राक्षसी लाईटबिलामुळे मायणी ग्रामपंचायतीवर थकीत बिलाचा दरवर्षी भार वाढवणारी प्रादेशिक योजना बंद असूनही डॉ.दिलीपराव येळगावकर व सरपंच सचिन गुदगे यांच्या संकल्पनेतून तीन विहिरीतून पाण्याचा उपसा सुरळीत करून संबंधित प्रादेशिक योजनेच्या लाभक्षेत्रातील भागाला पाणी पोहचवण्यात ग्रामपंचायतीने यश मिळवले आहे.
सध्या सर्वत्र ग्रामपंचायत व वीज वितरण कंपनी यांच्यात स्ट्रीट लाईट बिलासंदर्भात खटके उडत असलेले पहावयास मिळत आहेत.याचाच प्रत्येय मायणी गावासही आला.मायणी प्रादेशिक नळपाणी पुरवठा लाइटबीलाच्या प्रश्नी खंडित झाला व मायणीकरांना ऐन पावसाळ्यात तांत्रिक पाणीटंचाईस सामोरे जावे लागले. कोरोना काळात जीवाची भीती बाळगत लॉकडाऊन होऊन आर्थिक टंचाईला सामोरे जाणाऱ्या जनतेला वेठीस धरू नका ,यासाठी माजी आमदार दिलीपराव येळगावकर यांनी आक्रमक होत थेट विद्युत मंडळास लोकांना सहकार्य करा अन्यथा मोठे आंदोलन छेडू असा इशारा दिला.
प्रादेशिक योजना सुरळीत करण्यासाठी सरपंच सचिन गुदगे यांनी थकीत बिलातील १० लाखाची रक्कम भरण्यास सहमती दर्शवली परंतु अचानक वीज वितरण कंपनीने बिलाची रक्कम वाढवून २५ लाख केल्याने मायणीची नळपाणी प्रादेशिक योजना सुरळीत होण्याचा मार्ग धूसर झाला.
विद्युत कंपनीने घेतलेल्या या पावित्र्याने सरपंच सचिन गुदगे व त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला व विद्युत महापारेषण कंपनीकडून मायणी ग्रामपंचायतीस करापोटी येणे असलेली साडेसतरा लाखाची थकबाकी याबाबत विद्युत कंपनीस अनेक नोटिसा पत्रव्यवहार करूनही विद्युत महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याने थेट विद्युत महापारेषण कार्यालयाला टाळे ठोकले. त्यामुळे कातरखटाव,मायणी, पुसेसावळी,झरे या भागातला विद्युत पुरवठा खंडित झाला.यामुळे सर्वत्र खळबळ माजली.
याविषयी महसूल विभाग व इतर विभागांनी सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांना टाळे खोलण्याबद्दल विनंती केली परंतु गावातील ग्रामस्थांचे पाण्याविना होणारे हाल याचा विचार करून कोरोना काळात वीज कंपनीने ग्रामपंचायतीस सहकार्य करण्याची विनंती कंपनीस करूनही यास प्रतिसाद मिळला नसल्याने सरपंच आणि त्यांचे सहकारी आपल्या भूमिकेवर ठाम राहून कराची रक्कम ग्रामपंचायतीस दिल्याशिवाय टाळे खोलणार नसल्याचे स्पष्ट केले.
सरपंच सचिन गुदगे व सहकाऱ्यांच्या या अनपेक्षित झटक्याने वीज कंपनी भानावर आली व कराच्या रक्कम देण्याच्या जबाबदारीस झिडकाऱ्या विद्युत पारेषण कंपनीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सात लाख ऐंशीहजार सातशे बावीस रुपयाचा चेक ताबडतोब ग्रामपंचायतीस पोहच करीत उरलेल्या रकमेची मुदतवाढ मागितली.यास सरपंच सचिन गुदगे यांनी या कार्यालयाला मुदतवाढ देऊन आपल्या संयमी वृत्तीचे दर्शन घडवले.
याचबरोबर मायणी प्रादेशिक नळपाणी पुरवठा बंद झाल्याने लोकांची मोठी फरफट झालेने हा पाणीपुरवठा सुरळीत करणे आवश्यक होते. यासाठी डॉ.येळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सचिन गुदगे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी तातडीने मार्ग काढून मायणी - मरडवाक रस्त्यावरील पडळकर वस्ती नजीकच्या जालिंदर माळी,राजुशेठ झगडे,राजाराम कचरे यांच्या खाजगी मालकीच्या असणाऱ्या तीन विहिरीतून पाणी उचलून प्रादेशिक योजनेच्या पाईपमार्गे वडूज रोड येथील जलकुंभला आणण्यात आले.यामुळे नदाफ कॉलनी,श्रीराम कॉलनी,चांदणी चौक परिसर,विठोबा मंदिर परिसर,कचरेवाडी,इंदिरानगरचा काही भाग,शेडगेवाडी रोड परिसर,सराटेमळा,वडूज रोड परिसरचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.संबंधित विहीर मालकांनी आपल्या विहिरीचे पाणी गावाच्या पाणीटंचाईचा विचार करता हे पाणी मोफत देण्याचे ठरवले असून यासाठी जालिंदर माळी,राजूशेठ झगडे,राजाराम कचरे यांचे कौतुक होत आहे.
कोटींची थकीत असणाऱ्या प्रादेशिक योजना सुरळीत होण्यासाठी अधिक वेळ न दडवता कमी खर्चात गावाचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात मायणी ग्रामपंचायतीस यश आले आहे. नागरिकांनी या काळात सुद्धा संयम दाखवला याबद्दल सरपंच सचिन गुदगे यांनी मायणी ग्रामस्थांचे मानले आहे. हा पाणी पुरवठा सुरळीत करण्याकामी उपसरपंच आनंदाराव शेवाळे,ग्रा.पं.स.विजयकुमार कवडे, जगन्नाथ भिसे,नितीन पडळकर व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
फोटो
वीज कंपनी व ग्रामपंचायत यांच्या संघर्षात कधी विजबिलाच्या थकीतापोटी पाण्याविना कोरडा असणारा तर कधी गावास सुरळीतपणे पाणीपुरवठा करून तहान भागवणारा हाच तो विद्युत मंडळाच्या कार्यालयास खेटून उभा असणारा जलकुंभ.....फोटो -दत्ता कोळी.

