इंदापूर : प्रतिनिधी =
सामान्य जनता हेच काँग्रेस पक्षाचे खरे बळ आहे. जनतेशी नाळ जुळल्यानेच अनेक संकटे येवून देखील काँग्रेसचे अस्तित्व कायम टिकून आहे,असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी इंदापूरातील पक्षाच्या आढावा बैठकीत बोलताना केले.
माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षांतरामुळे इंदापूर तालुक्यामध्ये मजबूत असणारी काँग्रेस अचानक कमकुवत झाल्याने काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देण्याच्या, तसेच भविष्यात येऊ घातलेल्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकींच्या अनुषंगाने, काँग्रेस पक्षाचे पुरंदरचे विद्यमान आमदार व पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा युवकचे सरचिटणीस जावेद शेख, वीरधवल गाडे आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या उपस्थितीत विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
आ. संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर शहराध्यक्ष पदी तानाजीराव भोंग, पुणे जिल्ह्याच्या सरचिटणीस पदी सामाजिक कार्यकर्ते जकीरभाई काझी, इंदापूर तालुका उपाध्यक्ष पदी बिभीषण लोखंडे, शहर उपाध्यक्ष म्हणून तुषार चिंचकर, शहर कार्याध्यक्ष पदी चमनभाई बागवान, विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी शंभूराज साळुंके तर उपाध्यक्ष म्हणून प्रमोद खबाले, तालुका सरचिटणीस म्हणून नितीन राऊत, आणि इंदापूर शहर सहसचिव म्हणून सुरेश लोखंडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना आ. जगताप म्हणाले की, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सन २००९ पर्यंत इंदापूर तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व होते. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अचानक काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशाआधी काँग्रेसच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पाटील यांना पक्ष सोडू नये अशी गळ घातली होती. तर अनेकांनी ते पक्ष सोडत असल्याबद्दल साखर वाटत आनंदोत्सव साजरा केला होता,असेहीे ते म्हणाले.
दरम्यानच्या काळात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत व त्यांच्या सहका-यांनी पक्ष संघटनवाढीसाठी अथक काम केले याबद्दल जगताप यांनी त्यांची प्रशंसा केली.
ते पुढे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील काँग्रेसमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आगामी काळात होणा-या नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे बळ देईल.
इंदापूर नगरपरिषद हेच आपले पहिले टार्गेट असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नियुक्तीनंतर बोलताना पुणे जिल्हा सरचिटणीस जकीर काझी म्हणाले की, सामाजिक कार्य हाच आपल्या राजकारणाचा पाया आहे. त्याच्या जोरावरच तालुक्यात पक्षाला ताकद देण्याचे काम आपण करणार आहोत. शहराध्यक्ष तानाजीराव भोंग म्हणाले की, ब-यावाईट प्रसंगात पक्षाच्या विचारांशी कदापि तडजोड केली जाणार नाही. पक्षवाढीस प्राधान्य दिले जाईल.
या आढावा बैठकीस काकासाहेब देवकर,भगवानराव पासगे,प्रदीप शिंदे,राहुल आचरे,राहुल जाधव,चेतन कोरटकर,निवास शेळके,संतोष शेंडे,सुफियान खान-शेख, विपुल भिलारे,दत्तु देवकर,अक्षय शेलार,समाधान बाबर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.