इंदापूर विचारमंथन परिवाराने दिला हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश

  




ग्रामीण महाराष्ट्र न्यूज : विशेष .

विचार मंथन परिवाराने दिले साक्षात विठ्ठलाचे दर्शन..

      देवयानी आषाढी एकादशीच्या दिवस...विठ्ठल नामाच्या गजरात अवघ वातावरण न्हाऊन निघाल्यानंतर भक्तीभावाचे गारुड मनावर रेंगाळत असतानाच,दोन दिवसांपूर्वी पावसाचे गटारमिश्रीत पाणी घरात शिरुन ज्यांच्या अन्नधान्याची,पिठाकुटाची माती झाली अश्या बाधितांना अन्नधान्याच्या कीट वाटपाचा सोहळा रंगतो.बाधितांमध्ये मुस्लिम समाजाची संख्या जास्त, पण वाटपात जात आडवी येत नाही ना धर्म....तेथे केवळ मानवतेच्या धर्माचा विठुराया, दानाची ओंजळ घेवून उभा असतो....हे सारं घडतं,राधिका हाॅलमध्ये...घडवतो इंदापूर विचार मंथन नावाचा परिवार....

         इंदापूर शहर हे उत्सवप्रिय शहर म्हणून ओळखले जाते.  शहरातील सर्व नागरिक सण -उत्सव गुण्यागोविंदाने  साजरे करतात. समाजात अभंग एकोपा आहे. एकाला जखम झाली तर त्याच्या वेदना दुस-यालाही होतात. मलम लावण्यासाठी मग अनेक हात पुढे येतात, हे नेहेमी दिसणारे दृश्य.
       
     हीच  मदत करण्याची प्रेरणा घेवून  माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ यांनी 'इंदापूर विचार मंथन परिवार' ह्या ग्रुपची निर्मिती केली. अरविंद  वाघ यांची  जडणघडण गरीबीतून झाली. गरीबीचे चटके सोसत त्यांच्या आईने त्यांना घडवले.त्या कष्टाची जाणिव ठेवून श्री. वाघ  यांनी अपार कष्ट करून आईचे  स्वप्न साकार केले. तिच्या आशीर्वादाने मिळालेल्या यशात ऐश्वर्यात सामान्य लोकांचे दु:ख,वेदना सामावून घेवून त्यावर आपल्या परीने मार्ग काढण्याचा त्यांचा नेहेमीच प्रयत्न असतो.

   कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर यंदा इंदापूर येथे पालखी सोहळा रंगला नाही. मात्र मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे जावईवाडीत घराघरात पाणी शिरुन लोकांच्या मीठापिठाचा व संसारोपयोगी साहित्याचा पार लगदा झाला. पालखीच्या काळात येणा-या वारक-यांसाठी इंदापूरकर वेगवेगळे उपक्रम राबवतात. इंदापूरकरांची ही इच्छा मात्र कोरोनामुळे अपूर्ण राहिली.ती जावईवाडीतील बाधितांना मदत करुन पूर्ण करण्याचा विचार पुढे आला.त्या दृष्टीने हा परिवार सजग झाला. सभासदांनी आपापल्या हिश्श्याचे पैसे जमा केले.त्या दोन हजार रुपये देणारे प्रा.कृष्णा ताटे होते.बचत गटाच्या मालकीचे धान्य चोरीला गेल्यानंतर अडचणीत आलेले हमीदभाई आत्तार होते.प्रत्येकी पन्नास किलो गहू व तांदूळ देणारे धरमचंद लोढा होते.आणि सर्वात मोठा वाटा देणारे खुद्द अरविंद वाघ ही होते.

      आज देवयानी आषाठी एकदशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता राधिका हाॅलमध्ये ज्येष्ठ वारकरी सांप्रदायिक विक्रम मोरे, दत्तात्रय शिर्के यांच्या उपस्थितीत श्रीविठ्ठल रखुमाईच्या प्रतिमेचे पुजन झाले.शहरातील भजनी मंडळाच्या भजन व किर्तनाचा कार्यक्रम झाला.त्यानंतर जावईवाडीतील बाधित कुटुंबांना अन्नधान्याच्या कीट वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला.
  
   अरविंद वाघ, बाळासाहेब सरवदे,गणेश महाजन, शिवाजीराव मखरे,विशाल चव्हाण,नितीनराव आरडे, धनाजी सुर्वे, माऊली नाचण, अजिंक्य वाघ,वाल्मिक खानेवाले, हमीदभाई आत्तार,हनुमंत कांबळे, चाँदभाई पठाण,मेहबूब मोमीन, राकेश कांबळे,दत्तात्रय दडस, शरद झोळ,माणिक तानवडे, हनुमंत जाधव,हनुमंत गोसावी, महादेव लोखंडे यांनी त्यासाठी परिश्रम घेतले.