इंदापूर : वार्ताहर
शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यास प्राधान्य देण्याची गरज निर्माण झाल्याचे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि.१७ जून) इंदापूर नगरपरिषदेच्या आढावा बैठकीत व्यक्त केले.इंदापूर नगरपरिषदेच्या कार्यालयात ही बैठक झाली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, सध्या शहरी भागात कोरोनाचा विळखा वाढत चालल्याचे दिसत आहे. एन.आय.व्ही.मध्ये शहरातील कोरोना चाचण्यांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तपासण्या कमी होत आहेत. परिणामी तपासणी अहवाल मिळण्यास विलंब लागत आहे.
या परिस्थितीत राज्य सरकारने एन.आय.व्ही.मध्ये जादा स्टाफ नेमून ग्रामीण भागातील तपासण्यांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे असे ते म्हणाले.
ज्या वेळी शहरात एक ही रुग्ण नव्हता,त्यावेळी नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत होते. आज शहरात रुग्ण वाढत असताना,नागरिक परिस्थितीला गांभीर्याने घेत नसल्याचा अनुभव येत आहे,असे सांगून ते म्हणाले की,परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी नगरपरिषदेने शहरातील,संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीस प्राधान्य द्यावे. इंदापूर शहरातील नागरिकांच्या ऑक्सिजनच्या पातळीची तपासणी करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनास किट पुरवण्यात यावेत. नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात जनजागृती करावी. त्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची मदत मिळावी अशा मागण्या पत्राद्वारे
जिल्हाधिकारी व राज्य सरकार यांच्याकडे कराव्यात, अशी सूचना पाटील यांनी दिली.
शहरातील सर्वच नगरसेवक व पदाधिका-यांनी नागरिकामध्ये जनजागृती करावी. शहरातील वाढता धोका कसा कमी करता येईल,यासाठी उपाययोजना कराव्यात. बाहेरुन इंदापूर शहरात दाखल होणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यावरती लक्ष ठेवावे. कोरोनासदृष्य लक्षणे दिसताच त्याची कल्पना प्रशासनास द्यावी तरच हा संसर्ग आपण रोखू शकतो,असे सांगून नागरिक व व्यापाऱ्यांनी स्वयंशिस्त राखावी. शासनाच्या अटींशी अधीन राहून व्यवहार करण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन हर्षवर्धन केले. यावेळी इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.प्रदिप ठेंगल, इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष भरत शहा, गटनेते कैलास कदम, भाजपाचे शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद, नगरसेवक जगदीश मोहिते, पांडुरंग शिंदे, गुड्डू मोमीन, रमेश धोत्रे, जावेद शेख व नगरपरिषदेचे कर्मचारी या आढावा बैठकीस उपस्थित होते.